वाशिम : एखादं कुटुंब अपघातात हरवतं किंवा एखाद्या यात्रेत दुरावतं. नंतर ते कुटुंब 15 ते 20 वर्षानंतर पुन्हा परत एकत्र येतं, असं आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना वाशिममध्ये समोर आली आहे. हरवलेलं कुटुंब तब्बल साडे तीन वर्षानंतर एकत्र आणण्याचं काम वाशीमच्या महिला बाल कल्याण अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

सविस्तर माहिती अशी कि, यवतमाळ जिल्ह्यातील वडद गावचे बाळू राठोड यांचं कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात नाशिक जिल्ह्यात गेले होतं. कामाच्या शोधानंतर त्यांना काही दिवसानंतर उसतोडणीचं कामही मिळालं. बाळू राठोड व त्यांचं कुटुंब काम करून आपला उदरनिर्वाह करत होते मात्र यवतमाळ जिल्ह्यातील एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आणि बाळू राठोड हे गावी निघाले. कुटुंबाला नाशिकला सोडून ते परत येणार होते मात्र बाळूची पत्नी अर्चना व छोटा मुलगा कुमार यांची रेल्वे स्टेशनवरून ताटातूट झाली.

बाळू जेव्हा नाशिकला परत गेले, तेव्हा त्यांना ही घटना कळली अन् त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हरवलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरवात केली मात्र यश मिळत नव्हतं. तशी तक्रारही त्यांनी पोलिसात दिली. मात्र शोध लागत नसल्याने सगळ्या आशा संपल्या होत्या. कुटुंबातील दोन सदस्य हरवल्याने कुटुंबावर संकट कोसळले. राठोड कुटुंब शोधून थकले मात्र यश काही मिळत नव्हते.

एक दिवस वाशिमचे महिला बालकल्याण अधिकारी यांना चेन्नईवरून फोन आला कि वाशीम आणि याडी उद्गारणारे एक बालक सापडले आहे. दीड वर्षापासून ते आमच्याकडे आहे. ओळख पटत असेल तर सांगा याडी शब्द म्हणजे बंजारा भाषेतील आई होतो आणि वाशीमचे सुभाष राठोड हे देखील बंजारा असल्याने त्यांनी त्या मुलाला बंजारा भाषेत बोलले आणि आशेचा किरण गवसला.

वाशीम जिल्ह्यात कुणी बालक हरवला का? याचा शोध घेतल्यानंतर माहिती मिळाली कि वाशीमचा कुणी बालक नसून यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वडद गावातील एक बंजारा कुटुंबातील दोन सदस्य हरवले आहेत. त्यानंतर त्यांना वाशीम बोलावून चौकशी केली असता हरवलेल्या मुलाचा अंदाज घेतल्यानंतर कुमारला चेन्नई येथून वाशीम इथं आणलं गेलं. तब्बल दीड वर्षा नंतर पालकांना कुमारने ओळखले. अधिकाऱ्यांनी हरवलेलं बालक पालकांच्या स्वाधीन केले.

महिला बालकल्याण अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितलं की, कुटुंबापासून दूर झालेल्या कुमारला शोधणं आव्हान होतं. त्याला फक्त स्वत:च नावच येत होतं. वाशीम आणि बंजारा शब्द आई म्हणजे याडी यायचं. तर आई मानसिक रुग्ण होती त्यामुळे शोध घेणं कठीण होतं. मात्र वाशीम नावामुळे कुमार हा चेन्नईमध्ये सापडला तो दीड वर्षानंतर तर कुमारची आई अर्चना राठोड यांना देखील दोन वर्षानंतर गुजरातच्या सुरतमधील महिला आश्रम मधून शोधून काढण्यात यश आले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/lost-family-in-washim-came-together-after-a-staggering-three-and-a-half-years-980239
0 Comments