मुंबई : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुन देशासमोर उत्तम उदाहरण घालून देऊया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी रविवारी (30) मे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना, लॉकडाऊन, च्रकीवादळ यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी चांगली कामगिरी करुन कोरोनामुक्त गाव करणाऱ्या संरपंचांचे कौतुक देखील केलं.

आपण राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार', अशी वेगवेगळी अभियानं यशस्वीरित्या राबवली. आता शहर आणि गावांनी ठरवलं तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झालं तर राज्य कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचं आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुया," असं आवाहन त्यांनी केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचांच्या कामाचा गौरव केला.

राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही 67 हजारांवरुन 24 हजारांवर आली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचं सांगताना सावधगिरीने पुढे जावं लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच पुढील 15 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं सांगताना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-cm-uddhav-thackeray-praised-work-of-sarpanch-ruturaj-deshmukh-988775
0 Comments