Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा, आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10, 353 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,19,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.02% टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1400 रुग्ण तर नंदूरबारात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातव वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता राज्य सरकारकडून लवकरच दिला जाणार आहे. निवृत्तीवेतनच्या थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतन सोबत रोखीने दिली जाणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी सातवा वेतन आयोग थकबाकीच्या दुसरा हफ्ता ऑगस्ट महिन्याच्या पगाराबरोबर दिला जाणार आहे. तर जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा तसेच इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची थकबाकी रक्कम सप्टेंबर महिन्यातील पगारात दिली जाणार आहे.

Corona Vaccination : मुंबईत उद्या लसीकरण बंद राहणार; पुरेशा लस साठा उपलब्ध नसल्याने प्रशासनाचा निर्णय
मुंबईकरानो, उद्या सकाळी लवकर उठून पटापट आवरुन लस घेण्यासाठी जाणार असाल तर, जरा थांबा. उगाच निराशा करुन घेऊ नका. कारण उद्या मुंबईत लसीकरण बंद असणार आहे. पुरेशा लस साठ्याअभावी उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती दिली जाईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सार्क देशांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे सडक्या सुपारीची आयात, केंद्र सरकारला कोट्यवधींचा चुना
सार्क देशांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे इंडोनेशियामधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या सडक्या व धोकादायक सुपारीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबादमधील 17 ठिकाणी चौकशी केली आहे. या प्रकरणात नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद मधील काही व्यापाऱ्यांनी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्र सरकारला शेकडो कोटींचा कस्टम ड्युटीचा चुना लावल्याचे समोर आले आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-01-2021-maharashtra-political-news-992831
0 Comments