राज्यात मंगळवारी 8,085 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 231 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात काल (29 जून) 8,085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Whip: 'अधिवेशन संपेपर्यत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहा', शिवसेनेकडून व्हिप जारी

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै 2021 असे दोनच दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना अधिवेशन संपेपर्यत आमादारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिप आपल्या आमदारांना बजावला आहे. शिवसेनेकडून मंगळवारी (29 जून) आपल्या आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, "राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलैला होत आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करुन मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांनी संपूर्ण दिवस उपस्थित राहावं असा पक्षादेश आहे". हा व्हिप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी यांनी शिवसेना विधीमंडळ पक्षनेते कार्यालय या पत्राद्वारे जारी करण्यात आला आहे.

'निकोटीन' कोरोनापासून बचावासाठी परिणामकारक; जाणकारांच्या समितीचा अहवाल हायकोर्टापुढे सादर

धुम्रपानामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. उलट त्यातील `निकोटीन’ हा कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज मंगळवारी फेडरल रिटेलर असोसिएशन आणि पान-बिडी-तंबाखू विक्रेता संघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. त्याची दखल घेत या दाव्यात तथ्य आढळल्यास केंद्र सरकारला आता सिगरेटसह अन्य तंबाखूच्या पाकिटांवरुन वैधानिक इशारा काढायला हरकत नाही, असा खोचक टोला हायकोर्टानं लगावला. मात्र हा हस्तक्षेप अर्ज दाखल करुन घेत त्यांना सविस्तर युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनवल्यानंतर काल (29 जून) कोर्टात हजर केलं होतं. यात 1 इराणी कोरिओग्राफर महिला आणि 4 साऊथ सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रींची समावेश आहे. कोरोना नियम उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थ यांचं सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. रेव्ह पार्टीत ड्रग्स वापर करणाऱ्यांसोबत यांच्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टानं केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-april-05-2021-maharashtra-political-news-maharashtra-corona-update-delta-plus-variant-992689
0 Comments