Thane : गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करा, ठाण्यातील गणेश मंडळांची राज्य सरकारकडे मागणी
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा सुपुत्र या नात्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर येत्या काही दिवसात ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा समितीने दिला आहे.

Maratha Reservation : मोठी बातमी... मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation update) सुप्रीम कोर्टातून (Supreme Court )अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर एस ई बी सी आरक्षणाचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या सहीने केवळ याचा आयोगाला असल्याचे निकालात म्हटले आहे. राज्यांना हे अधिकार नसल्याचं मत खंडपीठाने नोंदवलं होतं. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अपील केलं होतं. पण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज सुप्रीम कोर्टात केंद्राचीही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ एस ई बी सी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करायचे असतील तर हा निर्णय केवळ केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो.

Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 9,195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मालेगावात रुग्णसंख्या शुन्यावर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,634 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,28, 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 252 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1057 रुग्ण तर मालेगावात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

ABP Majha Exclusive : 'अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात', स्वीय सचिव पलांडेंची कबुली, कारवाईचा तपशील माझाच्या हाती
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील माझाच्या हाती लागला आहे. ईडी कोर्टात अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध मोठा आरोप करण्यात आला आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे, अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खास करुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी 4 मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे. पलांडे यांच्या या कबुलीमुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-april-05-2021-maharashtra-political-news-992981
0 Comments