Zika Virus: झिका व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! काय आहेत या आजाराची लक्षणं, काय घ्यावी काळजी
महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावातील व्यक्तिला झिका नावाच्या विषाणुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिका विषाणू जीव घेणा नसला तरी तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो.. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

राज्यात शनीवारी 7, 467 रुग्णांना डिस्चार्ज, 6,959 रुग्णांची भर; 32 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून नऊ हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 6,959 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे.

राज्यात आज 225 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 76 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (72), वाशिम (86), गडचिरोली (15) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 674 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Pune : ती ऑडिओ क्लिप बनावट, हप्तेखोरीचं रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळे माझ्याविरोधात षडयंत्र: पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे
फुकट बिर्याणीची मागणी करण्याचा आरोप असलेल्या पुण्यातील पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी आता त्यांची बाजू एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. बिर्याणीबद्दल व्हायरल झालेली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेली ती ऑडिओ क्लिप मॉर्फ्ड अर्थात बनावट असल्याचा दावा आयपीएस अधिकारी असलेल्या प्रियांका नारनवरे यांनी केलाय.

त्याचबरोबर त्या ज्या झोनच्या पोलीस उपायुक्त आहेत तिथे मागील बारा वर्षांपासून सुरु असलेले वसुलीचे रॅकेट आपण उद्धस्त केल्यामुळेच आपल्याविरुद्ध बनावट क्लिपच्या सहाय्याने कट रचण्यात आल्याचा आणि त्याला पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. आपली बदली व्हावी यासाठी हे कारस्थान रचलं गेल्याच प्रियांका नारनवरे यांनी म्हटलंय.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-1-2021-maharashtra-political-news-rain-news-mumbai-996906
0 Comments