जळगाव : मी ईडी लावली तर मी सिडी लावेल, हे वक्तव्य केलं होतं त्यानुसार ही सिडी योग्य वेळी येईलच, या सिडीची चौकशी पोलीस गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत, त्याचा अहवाल आल्यावर मी तो जाहीर करणार आहे, असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. दरम्यान, भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंची ईडीकडून सध्या चौकशी सुरु आहे. तसेच याप्रकरणी एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, "मी ईडी लावली तर मी सिडी लावेल, हे वक्तव्य केलं होतं त्यानुसार ही सिडी योग्य वेळी येईलच, या सिडीची चौकशी पोलीस गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत, त्याचा अहवाल आल्यावर मी तो जाहीर करणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. या कालावधीत माझ्यावर कोणताही आक्षेप आलेला नाही. मात्र सध्या जमिनी संदर्भात माझ्यावर लावण्यात आलेला आक्षेप हा हेतू पुरस्कार लावण्यात आलेला आहे."

"या व्यवहाराची संपूर्ण चौकशी झाली आहे. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणात कोणतंही तथ्य नसल्याचा अहवाल एसिबीनं दिलेला आहे आणि तरीही ईडीची चौकशी सुरु आहे. मात्र कर नाही तर डर कशाला पाहिजे. म्हणून मीसुद्धा या ईडी चौकशीला सामोरं जात आहे. महाराष्ट्राच्या विधान सभेत मी अनेक वेळा माझा दोष काय आहे? ते विचारलं आहे. आणि दोषी असेल तर फासावर लटकवा, असंही सांगितलं होतं. आता पुन्हा ईडीनं चौकशी लावली आहे." , असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तींची चौकशी करावी : एकनाथ खडसे

"ईडी चौकशीत काय ते समोर येईल चूक असेल तर कारवाई होईल. न्यायालय श्रेष्ठ आहे आणि न्याय व्यवस्था काय ठरवेल ते बघू. मात्र चंद्रकांत पाटील यांनी जे सांगितलं आहे. त्यांनी ईडी चौकशी लावली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी असंही म्हटलंय, आमच्याकडे जे भ्रष्ट असतील, गैरव्यवहार करणारे असतील तर आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. त्यामुळे माझी अपेक्षा आहे, त्यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या शेजारी बसलेल्या व्यक्तींकडे पहावं आणि आपला शब्द पूर्ण करावा. उभा महाराष्ट्र पहात आहे की, किती शुद्ध चारित्र्य असलेली माणसं चंद्रकांत पाटील यांच्या अवती भवती आणि भाजपमध्ये आहेत.", असं एकनाथ खडसे म्हणाले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/she-will-install-the-cd-at-the-right-time-start-her-investigation-by-police-will-announce-when-report-is-received-says-eknath-khadse-1001106
0 Comments