<a href="https://ift.tt/3kJhujw Flood : चाळीसगावात पुराचं पाणी ओसरलं, 500 हुन अधिक गुरं वाहून गेल्याची प्रशासनाची माहिती

जळगावातील चाळीसगावात मुसळधार पावसामुळं पूरस्थिथी निर्माण झाली होती. चाळीसगाव तालुक्यातील 750 हून अधिक गावांमध्ये पाणी शिरलं होतं. तर आतापर्यंत एका महिलेचा या पुरात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच अद्याप कोणती बेपत्ता असल्याची तक्रार मिळालेली नसल्याची माहितीही प्रशासनाकडून दिली गेली आहे. तसेच औरंगाबादच्या कन्नड घाटात आणि डोंगरी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस काल झाला. त्यामुळे घाटात जवळपास 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अद्यापही औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे.

जळगावच्या तळेगावात 145 मिमि, तर चाळीसगावात 90 मिमि पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. सध्या पुराचं पाणी ओसरलं असून अनेक गावांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. चाळीसगावात दूध उत्पादक पट्ट्यात तडाखा बसल्यानं 500 हुन अधिक गुरं वाहून गेल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. पंचनामे आणि तातडीची मदत यासाठी गतीनं सूत्रं हलवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक गावात वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता आणि विस्तार/मंडळ अधिकारी, अशी पथकं नेमून वैद्यकीय तपासणी, पाणीपुरवठा दुरुस्ती आणि शुद्धीकरण, मृत पशूंची शास्त्रीय विल्हेवाट, नुकसान पंचनामे तात्काळ सुरु करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी दर्जाचे विशेष अधिकारी नियुक्त करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्वच्छतेसाठी पंचायत समिती आणि नागरपालिकेकडून नियोजन केलं जात असून तात्पुरत्या निवाऱ्यातील नागरीकांसाठी मूलभूत सुविधांचं नियोजन केलं जात आहे. प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक किटचे वाटप सुरु असून समाजसेवी संस्थांची भरघोस मदत मिळत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक स्वतः सकाळपासून घटनास्थळी हजर असून गावांना भेटी देत आहेत.

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिलासा, त्यांच्या विरोधातील न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया रद्द

बीड जिल्ह्यातील नरेगा घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणं जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना चांगलंच भोवलं होतं. या प्रकरणात उच्च न्यायालयानं बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार रवींद्र जगताप यांची बीडमधून बदली झाली सुद्धा मात्र याच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयातून दिलासासुद्धा मिळाला आहे. न्यायालयानं त्यांच्या विरोधात सुरु केलेली न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया रद्द केली असून त्या संदर्भात निकालपत्रात ओढलेले काही ताशेरे देखील निकालपत्रातून वगळण्यात आले आहेत.

2011 ते 2020 च्या दहा वर्षांच्या काळात बीड जिल्ह्यात झालेल्या नरेगा मधल्या घोटाळ्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणी प्रशासनानं तपास करावा, असे न्यायालयानं सांगितलं होतं. मात्र बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या काळात या प्रकरणाकडं दुर्लक्ष झाल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं आणि त्याच वेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवीद्र जगताप यांची बदली करा, असे आदेश काढले होते. त्यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजवण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी पदावरून रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली, मात्र त्यांना अद्याप कोठे नियुक्ती देण्यात आलेली नाही.

या घटनेनंतर उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा न्यायालयानं पुनर्विचार करावा आणि अवमान प्रक्रियेतून दिलासा द्यावा, अशी याचिका रवींद्र जगताप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीदरम्यान जगताप यांच्या वकिलांनी न्यायालयाला रविंद्र जगताप यांच्यावर कोरोना नियंत्रणाची असलेली जबाबदारी, जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा असलेला तुटवडा या बाबींची माहिती देण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्याचा किंवा कोणाला वाचविण्याचा जगताप यांचा हेतू नव्हता, असं प्रकर्षानं मांडण्यात आलं. न्यायालयानं अवमान प्रक्रियेतून जगताप यांना दिलासा दिला असून नोटीस रद्द केली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-1st-2021-maharashtra-political-news-1001420
0 Comments