<p>आता पालघरमधील बोईसरमधून एक धक्कादायक बातमी. मंडळी एखाद्या अपराध्याला पकडण्यात दिरंगाई झाली तरी हरकत नाही, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होऊ नये, असा खरं तर पोलिसांचा कटाक्ष हवा. पण बोईसरमध्ये याच्या नेमका उलट प्रकार पाहायला मिळाला. स्थानिक पोलिसांच्या तपासात एका 12 वर्षाच्या निरपराध मुलाची अक्षरशः परवड झालीय. बोईसरमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अधिक शहानिशा न करता 12 वर्षांच्या संशयित मुलावर गुन्हा दाखल केला. आणि त्याची रवानगी थेट बालसुधारगृहात केली. या घटनेचा तपास पुढेही सुरु राहिला आणि एका महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील खऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. चैतुशिंग ठाकूर असं या 25 वर्षांच्या नराधमाचं नाव आहे. बोईसर पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्यानंतरच 12 वर्षांच्या मुलाची एक महिन्यानंतर बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. पण गेल्या एक महिन्यात त्या मुलाच्या कोवळ्या मनावर झालेला परिणाम, त्याचं आयुष्यभराचं झालेलं नुकसान, न कळत्या वयात आलेला बालसुधारगृहाचा अनुभव आणि त्याच्या कुटुंबाची झालेली बदनामी या सगळ्याची जबाबदारी आता कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-palghar-rape-case-update-crime-against-a-12-year-old-boy-on-the-charge-alone-sent-to-a-juvenile-detention-center-1005782
0 Comments