राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; रावसाहेब दानवेंचा आरोप
केंद्राची राज्य सरकारकडे कोळशाची 3000 हजार कोटींची थकबाकी राहिली आहे. मात्र बाकी असली म्हणून केंद्राने राज्याची कोणतीही अडवणूक केली नाही. राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि बाहेरून वीज खरेदी करून नफेखोरी करण्याचा उद्देश यामुळे राज्यात कोळशाची टंचाई जाणवत असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्य सरकारने वेळीच कोळसा खरेदी केला असता तर संभाव्य वीज संकट टळले असते. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजन तसेच राज्य सरकारला नफेखोरी करण्यासाठी बाहेरून वीज खरेदी करायची असल्याने राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. देशात कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पण काही राज्यं राजकीय द्वेषापोटी केंद्रावर आरोप करताना दिसून येतात.

टीम इंडिया 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद PCB कडे
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय आणि लष्करी संबंधाचा परिणाम क्रिकेटवरही होतो. या दोन देशांदरम्यान सीमेवर तणाव सुरु असल्याने गेल्या 17 वर्षांमध्ये टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा एकही क्रिकेट दौरा केला नाही. पण आता टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये होणाऱ्या आशिया कपच्या यजमानपदाचा मान पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (PCB) मिळाला आहे.'क्रिबझ' या क्रिकेटशी संबंधित वेबसाईटने माहिती दिली आहे की, 2023 साली होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनाची संधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिळाली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार की यूएईमध्ये खेळवण्यात येणार याचा खुलासा पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अद्याप केला नाही.

टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे.. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Maharashtra Corona Update : मुंबई, पुण्यात अजूनही सक्रीय रुग्णसंख्या जास्त! राज्यातील स्थिती जाणून घ्या
राज्यात कोरोना संसर्ग आता आटोक्यात येताना पहायला मिळत आहे. दैनदिन कोरोना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे. असे असले तरी पुणे आणि मुंबईत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात अद्याप कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, राज्यात आज 2,149 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 15 हजार 316 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8 हजार 079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर त्याखालोखाल मुंबईत 6 हजार 255 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहे. राज्यात सर्वाधिक दैनदिन रुग्णसंख्येची नोंद होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 3 हजार 567 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-16-october-2021-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-farmers-protest-news-1007929
0 Comments