Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया... घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन

Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला (Ganesh Utsav 2022) प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.

गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
बाप्पाचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आहे, असं प्रसिद्ध दाते पंचांगचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे. "ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करु शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी," असं मोहन दाते यांनी सांगितलं.

इतर दिवशीही गजबजलेली मुंबई आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोषणाईने आणखी उजळून निघाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतींच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा सुरु होतील. तर गौरी आणि सात दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळांतील देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढेल.

Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी येथील ईदगाह (Hubballi Eidgah) मैदानावर गणेशोत्सवाची पूजा करण्यास परवानगी दिली आहे. धारवाड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळत न्यायालयानं काही अटींसह पूजेला परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) गणेश चतुर्थीला परवानगी देण्याचा अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारताना हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवलं होतं.

राज्य सरकारनं पूजेला परवानगी दिली होती

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानं यापूर्वी मैदानात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु विभागीय खंडपीठानं सरकारला पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या लोकांच्या अर्जांवर विचार करण्यास सांगितलं होतं. यानंतर राज्य सरकारनं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी पूजेला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कर्नाटक वक्फ बोर्डानं (Karnataka Waqf Board) ही जागा आपली संपत्ती म्हणून घोषित केली होती. तसेच, वर्षानुवर्ष या मैदानात ईदची नमाज अदा केली जात असल्याचं कर्नाटक वक्फ बोर्डानं म्हटलं होतं.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-31-august-2022-today-wednesday-marathi-headlines-political-news-mumbai-news-national-politics-news-1095402
0 Comments