Akola Crime News : शिवसेनेच्या शिंदे गटाचा अकोला उपशहरप्रमुख भागवत देशमुखची (Bhagwat Deshmukh) हत्या करण्यात आली आहे. तो अकोल्यातील कौलखेड भागातील रहिवाशी होता. तो 25 ऑगस्टपासून घरून बेपत्ता झाला होता. विशेष म्हणजे 23 ऑगस्टलाच त्याने अकोल्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याची नियुक्ती लगेच शिंदे गटाच्या अकोला उपशहरप्रमुख पदावर करण्यात आली होती. अज्ञातांनी चार दिवसांपुर्वीच गळा दाबून हत्या करीत त्याचा मृतदेह कापशीच्या तलावात फेकला होता. दोन दिवस पाण्यात राहिल्याने त्याचा मृतदेह खराब झाला होता. त्यामूळे मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनीच त्याच्यावर अज्ञात मृतदेह म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. यानंतर उत्तरीय तपासणी अहवालात त्याची गळा दाबून हत्या झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर एका रूमालात बांधून फेकलेली त्याची कागदपत्र आढळलीत. भागवत देशमुखची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. पातूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. वैयक्तिक वादातून भागवतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भागवतच्या आईने काल तो बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर तो मृतदेह भागवत देशमुखचाच असल्याची बाब समोर आली. तो अनेकदा घरून गायब राहत असल्यानं घरच्यांनी तक्रार उशिरा दिल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे.

...अन् भागवतचा मृतदेहच सापडला :

27 ऑगस्टला पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र, वैद्यकीय तपासणी अहवालात या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं. आता पोलिसांनी या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, तलावाच्या पाण्यात दोन दिवसापासून मृत्यू पडून असल्याने युवकाची ओळख पटवणं पोलिसांना शक्य झालं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर 29 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार केलेत. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरातील पाहणी केली. तेंव्हा घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर एका रुमालामध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्यात. या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या युवकाची बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशन येथे दाखल होती. त्यामुळे कापशीला सापडलेला मृतदेह भागवत देशमुख याचाच असल्याचं स्पष्ट झालं.

23 ला शिंदे गटात प्रवेश अन् 25 ऑगस्टपासून 'भागवत' बेपत्ता

भागवतच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार तो गेल्या 25 ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. अखेर नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलेही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याचा अंत्यविधी उरकून टाकला .

गळा आवळून तलावात फेकला मृतदेह :

दरम्यान, पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत देशमुख याचा अज्ञात लोकांनी आधी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला, असं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. याप्रकरणी पातूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, भागवतची हत्या 25 ऑगस्ट रोजीच झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहे भागवत देशमुख? :

भागवत देशमुख सुरुवातीला काही ठिकाणी वाहन चालक म्हणून काम करीत होता. आता अलिकडे त्यानं आपला मोर्चा राजकीय क्षेत्रात वळवला होता. अलिकडेच 23 ऑगस्टला त्याने अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी त्याने शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. लगेच त्याच्या खांद्यावर शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-shinde-group-party-worker-murder-in-akola-police-news-latest-update-1096030
0 Comments