Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न, औरंगाबादचं साळुंके दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. त्याचबरोबर गेली 50 वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गेली 50 वर्ष ते पंढरपूरची वारी करत आहेत.

फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा

फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Facebook India Head Ajit Mohan) यांनी आज अचानक राजीनामा दिला. वृत्तानुसार, अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. याआधी उमंग बेदी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. ज्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये पद सोडले. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटा प्लॅटफॉर्मने जाहीर केली आहे. मोहन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मेटा इंडियाचे संचालक आणि भागीदारी मनीष चोप्रा हे त्यांच्या जागी कंपनीचा अंतरिम कार्यभार स्वीकारणार आहेत.

कोरोना लसीकरणावरुन भेदभाव?

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याविरोधात मुंबईतील मुलुंड येथील कनिष्ठ न्यायालयाने समन्स जारी केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले नागरिक असा भेदभाव करणारे आदेश जाहीर केल्याबद्दल त्यांच्याविरोधात याचिका करण्यात आली होती. ज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51(ब) सह 54, आणि 55 अंतर्गत त्यांना दोषी ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या खटल्याच्या पुढील सुनावणीदरम्यान तिघांनाही प्रत्यक्ष किंवा वाकिलांमार्फत कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत राष्ट्रीय प्राधिकरणानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची जाणूनबुजून अवहेलना आणि उल्लंघन करून निव्वळ लस तयार करणाऱ्या कंपन्यांना फायदा करून देण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार आणि इतर सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याच्या हेतुनं हे लसीकरण सक्तीचं केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अंबर कोईरी यांनी ही तक्रार दाखल केली होती. याशिवाय या तिघांविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करणारी याचिकाही दाखल केली होती. त्यात तिघांनाही प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. त्या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकेची दखल घेत त्यावर 11 जानेवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-04-november-2022-firday-today-marathi-headlines-political-news-mumbai-news-national-politics-news-maharashtra-live-updates-marathi-news-live-updates-1117178
0 Comments