Maharashtra Assembly Budget Session : महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-समाने येण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या आठवड्यात शिंदे गटाकडून युक्तीवाद होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दिले आहे. त्याचे पडसादही या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर पडण्याची शक्यता आहे. शिंदे-ठाकरे गटात या मुद्यावरून जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिव़डणूक यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

हे मुद्दे गाजणार?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही विरोधकांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे संकेत दिले आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जुनी पेन्शन योजना, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे, पाळत प्रकरण आणि हल्ल्यांचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी 14 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे अशक्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिक्षक मतदारसंघ विधान परिषदेत निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक संकेत दिले होते.

फडणवीस सादर करणार पहिल्यांदाच अर्थसंकल्प

वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-assembly-budget-session-start-from-today-27th-february-opposition-likely-aggressive-on-farmers-and-other-public-centric-issues-will-be-highlighted-1155241
0 Comments