APMC Election 2023 Result Live Updates : ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. तर 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे.

नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता

नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. देवळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला. पॅनल विजयी होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी विकासासाठी पक्षीय जोडे बाजुला ठेवून पॅनलची निर्मिती केल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितलं.

मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडेंना धक्का

अमरावतीमध्ये मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना धक्का बसला आहे. मोर्शी बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी तर भाजप, काँग्रेस (एक गट) 8 उमेदवार विजयी झाले आहे. हा अनिल बोंडे यांना धक्का मानला जातोय.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसती एकहाती सत्ता

भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं आव्हान दिलं होतं. मात्र, भाजपमधील गटा-तटाचं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचाच फटका भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. 18 जागा एक हाती स्वतःकडे खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/apmc-election-2023-result-live-updates-agricultural-produce-market-committee-election-latest-update-voting-apmc-maharashtra-1171589
0 Comments