28th May In History: प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी या दिवसात घडलेल्या असतात. आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा नाशिकमध्ये जन्म झाला. तर, देशातील नावाजलेले उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्मदेखील आजच्या दिवशी झाला.

1883 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म

भारतीय सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतीकारक असलेले विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्म. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिकमधील भगूर येथे झाला. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.

लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते.

1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, राजद्रोहाखाली सावरकर यांना अटक करण्यात आली. पुढे त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. ब्रिटीश सरकारची माफी मागत सावरकर यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. मात्र, ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बंधने घालत जवळपास 13 वर्ष रत्नागिरीत स्थानबद्ध केले.

हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. 1937 पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक उत्तम काव्य रचना केल्या. मराठी भाषेत त्यांनी अनेक नवीन शब्दांचा समावेश केला.

1903: मराठी उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म

भारताच्या उद्योगक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे किर्लोस्कर समूहाचे शंतनुराव किर्लोस्कर यांचा आज जन्म. किर्लोस्कर समूहाची स्थापना करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होत. शंतनुराव किर्लोस्कर हे जागतिक विचारवंत आणि एक उद्यमशील व्यक्ती होते ज्यांच्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळातही स्वतःच्या देशाच्या क्षमतेवर धैर्य आणि आत्मविश्वास होता. भारताकडे उर्वरित जगाचा एक भाग म्हणून पाहिले आणि भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचे काम केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर एस.एल. किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखाली किर्लोस्कर समूहाची झपाट्याने वाढ झाली. 1946 मध्ये त्यांनी किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांची अनुक्रमे बंगलोर आणि पुणे येथे स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आयात पर्याय म्हणून डिझेल इंजिनचे स्वदेशी उत्पादन विकसित करण्याचे श्रेय त्यांना जाते.

व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल 1965 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1923: तेलुगू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म

लुगु चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलावंत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचा जन्म. नंदमुरी तारक रामाराव असे त्यांचे नाव होते. त्यांची गणना तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होते. त्यांनी 200 पेक्षाही अधिक तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले.

1982 मध्ये त्यांनी तेलुगु देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका पक्षाने जिंकून रामारावांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. 1984 मधील एका महिन्याचा अपवाद वगळता ते 1989 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. 1989 च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगु देसम पक्षाचा पराभव झाला. पण 1994 साली पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि रामाराव दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

1964: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना

पॅलेस्टिनी राष्ट्रवादी राजकीय आणि लढाऊ संघटना पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची (PLO) स्थापना करण्यात आली. पूर्वीच्या अरबी एकता आणि पॅलेस्टाइन राज्याची स्थापना करण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना करण्यात आली. पीएलओ याचे मुख्यालय वेस्ट बँक मधील अल-बिरेह शहरात आहे आणि 100 हून अधिक देशांद्वारे पॅलेस्टिनी लोकांचे एकमेव कायदेशीर प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते ज्यांच्याशी त्याचे राजनैतिक संबंध आहेत. यासर अराफत यांनी दीर्घकाळापर्यंत या संघटनेचे नेतृत्व केले.

इतर महत्त्वाच्या घटना:

1660: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म.

1490: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

1940: दुसऱ्या महायुद्धात बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

1952: ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/28th-may-on-this-day-today-in-history-veer-savarkar-birth-anniversary-indian-businessman-shantanurao-kirloskar-birth-anniversary-1179466
0 Comments