हिंगोली: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा (OBC) प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे ज्यांच्या निजामकालीन कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसींचा कोणताही विरोध नाही. पण, सरसकटला विरोध आहे. दरम्यान, मराठ्यांची कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासनाने एक कोटी दस्तऐवज शोधल्यावर फक्त 5 हजार नोंदी सापडल्या आहे. त्यामुळे, संकटात सापडलेल्या सरकारला आता मनोज जरांगे (<a href="https://ift.tt/ExOAwrb Jarange) यांनी नवीन दावा करत धक्का दिला आहे. मराठा कुणबींची पोट जात असून, कोणत्याही पुराव्यांची गरज नाहीच असे जरांगे म्हणाले आहेत.

हिंगोली येथील दौऱ्यात बोलतांना जरांगे म्हणाले की, "पोट जाती म्हणून बऱ्याचशा जाती आरक्षणात घातल्या आहेत. मग, मराठा हा कुणबींची पोट जात होऊ शकत नाही का?, त्यामुळे पुराव्यांची आवश्यकताच नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. ती 70 वर्षांपासून यांच्याकडे नाही, असे जरांगे म्हणाले आहेत.

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "पुराव्याचा आधार तुम्हाला पाहिजे होता. आता पाच हजार पुरावे मिळाले आहे. त्यामुळे आता याच पुराव्याच्या आधारे तुम्ही महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ शकता. आता बहाणे सांगू नका,असेही जरांगे म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर...

मराठवाड्यात पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, "मग शोधा की बोगस प्रमाणपत्र, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार असतांना आता तुम्हाला या गोष्टी आठवतात. इतके दिवस झोपले होते का?, सत्तर वर्षापासून तर तुमची सत्ता आहे. आम्हाला काहीतरी मिळालं की तुम्ही विषय काढताय. ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढले त्यांचे मी समर्थन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, फुगीर आरक्षण घेऊन, जास्तीचा आरक्षण घेऊनही आम्ही तुम्हाला कुठे बोगस म्हटलो. 16 टक्क्यांवरचे आरक्षण घेतलं, मग तुम्हीपण बोगसच घेतलं. आम्ही पूर्वीपासून मराठा कुणबीमध्ये आहोत, ओबीसीमध्ये आहोत. त्यामुळे आम्ही जे आहेत तेच मागतोय, असे जरांगे म्हणाले.

कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांना द्यावे लागतील

आतापर्यंत ज्यांना आरक्षण दिलं त्यांचे पुरावे घेतलेलेच नाहीत. एका गावामध्ये एक पुरावा मिळाला तरी, त्या सर्व गावाला ओबीसी प्रमाणपत्र द्यावे लागेल. सगळेजण त्याच्या रक्ताचे नातेवाईक आहेत. त्यामुळे प्रमाणपत्र सगळ्यांना द्यावे लागतील. मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, आधार लागतो आणि पुरावा लागतो. आता पाच हजार पुरावे मिळाले असून, मराठ्यांच सोन झालं आहे. त्यामुळे आता कोणतेही बनवाबनवी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात, जालन्यातील परतूर तालुक्यात जल्लोषात स्वागत

source https://marathi.abplive.com/news/hingoli/maratha-reservation-maratha-caste-of-kunbis-manoj-jarang-new-claim-1214159
0 Comments