मुंबई : देशाचे दहावे आणि दलित समाजाचे पहिले राष्ट्रपती के आर नारायणन (K. R. Narayanan) यांचा आज जन्मदिन. तसेच आजच्याच दिवशी कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म झाला होता. 27 ऑक्टोबर 1937 मध्ये किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन झाले. 1795 मध्ये अमेरिका आणि स्पेनमध्ये करार, मिसिसिपी नदीमध्ये वाहतुकीला परवानगी . शिलाई मशिनचा शोध लावणाऱ्या आयझॅक मेरिट सिंगरचा जन्म झाला होता. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तयार तयार करण्यात आली होती. 2021 अग्नी 5 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले.

1874: कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म

भास्कर रामचंद्र तांबे 27 ऑक्टोबर 1874 मध्ये झाला. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी त्यांचा परिचय झाला होता. तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता 1935 मध्ये प्रकाशित झाली.. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आजोळ गाव देवास होते. देवासला भा. रा. तांबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे.

1904: स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म
जतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांतिकारी होते. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1904 मध्ये कलकत्ता येथे झाला. भगत सिंग आणि इतर क्रांतीकारकांसोबत जतिंद्रनाथ दास यांना लाहोर कटात अटक करण्यात आली होती. तुरुंगात सुरू असलेल्या भेदभावाविरोधात, अमानवीय वागणुकीविरोधात भगत सिंह आणि इतर क्रांतिकारकांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. यामध्ये जतिंद्रनाथ यांचाही सहभाग होता. ब्रिटिशांनी हे उपोषण मोडून काढण्यासाठी क्रांतिकारकांवर बळाचा वापरही केला. मात्र, उपोषण सुरूच राहिले. या उपोषणादरम्यान प्रकृती ढासळल्याने जतिंद्रनाथ दास यांचे 63 व्या दिवशी निधन झाले.

1920: भारताचे 10 वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म

देशाचे दहावे आणि दलित समाजाचे पहिले राष्ट्रपती के आर नारायणन यांचा आज जन्मदिन. कोचेरिल रमण नारायणन असं त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1920 रोजी त्रावणकोर या ठिकाणी झाला. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जीवावर संघर्ष करत, कठिण परिस्थितीला सामोरं जात शिक्षण घेतलं. त्याच जोरावर ते देशातील सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपदीपदावर विराजमान झाले. के आर नारायणन हे 1997 ते 2002 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.

1954: पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म

अनुराधा पौडवाल या मराठी गायिका आहेत. त्यांच्या माहेरच नाव हे अलका नाडकर्णी असं आहे. यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे.1973 सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत.अनुराधा पौडवाल या गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी, गरिबांच्या घरांना विजेची जोडणी करून देण्यासाठी आणि कुपोषणाच्या समस्येचे अल्पतः निवारण करण्यासाठी करतात. इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये अनुराधा पौडवाल यांचा, त्यांच्या संगीत कारकीर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला.तसेच त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.

1937 : सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन

अब्दुल करीम खॉं साहेबांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यात मुझफ्फरनगरजवळच्या कैराना येथील संगीत घराण्यात झाला. त्यांचे वडील काले खान हे गुलाम अलींचे नातू होत. अब्दुल करीम खॉं साहेबांनी आपले काका अब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका नन्हे खान यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गायनाबरोबरच त्यांनी सारंगी, सतार, वीणा आणि तबला वादनात नैपुण्य प्राप्त केले. सुरुवातीच्या काळात अब्दुल करीम खॉं साहेब आपले बंधू अब्दुल हक यांचेबरोबर गात असत. बडोदा संस्थानाचे राजे या बंधूंच्या गायकीवर खुश झाले व त्यांनी दोन्ही बंधूंची दरबारात गायक म्हणून नियुक्ती केली.अब्दुल करीम खॉं साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.म्हैसूरच्या वाटेवर ते धारवाडला आपल्या भावाकडे मुक्काम करत असत. तिथेच त्यांनी आपले ख्यातनाम शिष्य सवाई गंधर्व यांना गाणे शिकविले.

1978 : इजिप्तच्या अन्वर सादात आणि इस्त्रायलच्या मेनाखेम बेगिन यांना शांततेच्या नोबेलने सन्मानित

इजिप्तचे राष्ट्रपती मोहम्मद अन्वर सादत यांनी 1970 साली इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांनी इस्त्रायलसोबतचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. इस्त्रायलसोबत शांततेचा करार करणारा इजिप्त हा पहिलाच अरब देश होता. मोहम्मद अन्वर सादत यांनी हा करार केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे अरब देशांमध्ये असंतोष पसरला होता तर जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कट्ट्ररवाद्यांना त्यांचा हा निर्णय पटला नाही. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली.

मोहम्मद अन्वर सादत यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत अलिप्ततावादी भूमिका घेतली होती. इस्त्रायलसोबत केलेल्या शांती करारानंतर त्यांना आणि इस्त्रायलच्या मेनाखेम बेगिन यांना 27 ऑक्टोबर 1978 रोजी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

1987: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती आणि समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन

विजयसिंग माधवजी मर्चंट हे भारतचा ध्वज भारतकडून दहा कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते.उजखोरा फलंदाज आणि उजखोरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या मर्चंट यांनी 1929 ते 1951 दरम्यान मुंबईसाठी प्रथमश्रेणी सामने खेळले. त्यांची फलंदाजीची सरासरी 71.64 ही प्रथमश्रेणी क्रिकेट इतिहासातील डॉन ब्रॅडमननंतरची दुसरी सर्वोच्च सरासरी आहे.त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन इंग्लंड दौरे केले ज्यामधे त्यांनी 4000 पेक्षा जास्ती धावा केल्या.

2001 : बालसाहित्यकार भा. रा. भागवत यांचे निधन

भास्कर रामचंद्र भागवत हे कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (1976 मध्ये) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषतः कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रूपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक 1970 आणि 1980 च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.

2021: पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तयार

इस्त्रायलच्या पेगॅसस या तंत्रज्ञानाचा वापर करुन राजकारणी, पत्रकार आणि महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा आरोप झाल्यानंतर न्यायालयाने यासंबंधी तपास करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करण्यासाठी निर्देश दिले होते. 27 ऑक्टोबर 2021 रोजी ही समिती निर्माण करण्यात आली.

भारतातही अनेकांची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, दोन केंद्रीय मंत्री, माजी निवडणूक आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे दोन रजिस्ट्रार, निवृत्त न्यायाधीश, माजी अॅटर्नी जनरल यांचे निकटवर्तीय, काही सामाजिक कार्यकर्ते आणि 40 पत्रकारांवर पेगाससद्वारे पाळत ठेवली गेली असल्याचे एका वृत्तात म्हटले होते.

इतर महत्त्वाच्या घटना

1795 : अमेरिका आणि स्पेनमध्ये करार, मिसिसिपी नदीमध्ये वाहतुकीला परवानगी
1811 : शिलाई मशिनचा शोध लावणाऱ्या आयझॅक मेरिट सिंगरचा जन्म
1923 : उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म
1947 : समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.
1995 : युक्रेनच्या किव्हमधील चेर्नोबिल अणूभट्टी केंद्र बंद
1974 : गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन.
1984 : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/27-october-in-history-dinvishesh-birth-of-playback-singer-anuradha-paudwal-today-in-history-detail-marathi-news-1222748
0 Comments