अनेक चांगल्यावाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. दिग्गजांचा जन्म-मृत्यू या नोंदींसह इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आज महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन,जागतिक अपस्मार जागरुकता दिनही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज. आजच्याच दिवशी लेखक, नाटककार, निर्माते रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन (International Students Day)

17 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस (International Students Day) पाळला जातो. याच दिवशी संबंधित एक दुर्दैवी घटना देखील इतिहासात घडून गेली होती. नाझी (Nazi) काळात, 17 नोव्हेंबर 1939 रोजी, चेकोस्लोव्हाकिया (Czechoslovakia) वर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी निदर्शने काढत आंदोलने पुकारली होती. या विद्यार्थ्यांवर पलटवार करताना नाझी सैन्याने काही विद्यार्थ्यांना जीवे मारले तर हजारो विद्यार्थ्यांना अटक केली. या विद्यार्थी हुतात्म्यांची आठवण म्हणून हा दिवस जगभर पाळला जातो.

जागतिक अपस्मार जागरुकता दिन (epilepsy awareness Day)

अपस्मार हा मेंदूचा एक विकार आहे. ज्यामध्ये वारंवार झटके किंवा फिट येतात. अपस्मार या आजाराने जगात 5 कोटींपेक्षा जास्त लोक पीडित असून दरवर्षी 24 लाख रुग्णांची त्यात भर पडते. लहान मुलांपासून ते 80-90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनाही हा आजार होऊ शकतो. 17 नोव्हेंबर रोजी जागतिक अपस्मार दिनानिमित्त या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Death anniversary)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले. बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते. राजर्षी शाहू महारांजांच्या सोबत त्यांनी समाजसुधारणेचं काम केलं होतं. 1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे. 1960 साली बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केलं. त्यामाध्यमातून त्यांनी मराठी भाषकांची बाजू धरून गुजराती आणि दक्षिण भारतीयांच्या विरोधात व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केलं. 19 जून 1966 साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली. यानंतर मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी शिवसेना सत्तेत आली. शिवसेनेनं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी, नारायण राणे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या रुपानं तीन मुख्यमंत्री सत्तेत बसवले.

1525 : मुघल शासक बाबरने पाचव्यांदा भारत जिंकण्याच्या उद्देशाने भारतात प्रवेश केला.

1831 : ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर आणि व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

1869 : भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र 10 वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

1932 : तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात (3rd round table conference)

तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील 'लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ 46 प्रतिनिधी उपस्थित होते. 3. तिसरी गोलमेज परिषद ही परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 मध्ये भरली या परिषदेला एकूण 46 जण सदस्य उपस्थित होते. इंग्लंडमधील हुजूर पक्षाने भारतात नवीन राज्यघटना देण्यास नकार दिला होता असे असताना देखील तिसरी गोलमेज परिषद भरविण्यात आली होती या परिषदेत भारतातील संरक्षक विषयक प्रश्न सोडवण्यासाठी संरक्षण कमिटीची स्थापना झाली.

1966 : भारताच्या रीटा फरिया विश्वसुंदरी झाल्या (Reeta Fariya)

भारताच्या रीटा फरिया हिने विश्वसुंदरी हा जागतिक पुरस्कार जिंकला होता, हा पुरस्कार जिंकणारी ती आशिया खंडातील महिला होती. एक वर्ष मॉडेलिंगमध्ये उंची गाठल्यानंतर रीटाने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि या क्षेत्रात करिअर केले. त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जिजाबाई ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून एमबीबीएसमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनच्या किंग्ज कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेली. 1971 मध्ये तिने डेव्हिड पॉवेलशी लग्न केले आणि 1973 मध्ये हे जोडपे डब्लिनला गेले, जिथे तिने वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

1950 : ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे 14वे दलाई लामा बनले (Dalai Lama)

ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे 14वे दलाई लामा बनले. 6 जुलै 1935 रोजी दलाई लामा यांचा जन्म झाला. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना दलाई लामा अश्या संज्ञेने उल्लेखले जाते. 17 नोव्हेंबर, 1950 रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून 1989 साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

1932 : शकुंतला महाजन तथा 'बेबी शकुंतला’ यांचा जन्म (Shakuntala Mahajan)

शकुंतला महाजन तथा 'बेबी शकुंतला’ यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमिट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शकुंतला महाजन. वयाच्या 82 व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला.

1938 : रत्‍नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते यांचा जन्म

रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1938 साली झालेला. ते मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते. मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी 'नाटक’ शिकवले. 18 मे 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

1982: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाणचा जन्म (Yusuf Pathan)

युसूफ पठाण हा भारतीय क्रिकेट संघाचा एक अनुभवी खेळाडू राहिलेल्या युसुफ पठाणचा आज जन्मदिवस. युसुफ पठाण हा अष्टपैलू खेळाडू. 2007 चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता त्यावेळी युसुफ संघाचा सदस्य होता. युसुफ पठाण उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करायचा. आता तो निवृत्त झाला आहे.

1928 : स्वातंत्र सैनिक लाला लजपतराय यांचा मृत्यू (Lala Lajpat Rai)

थोर स्वातंत्र सैनिक लाला लजपतराय यांचा आजच्याच दिवशी 1928 साली मृत्यू झालेला. त्यांच्या जन्म 28 जानेवारी 1836 साली झाला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. पंजाब केसरी अशी त्यांची ओळख. लाला लजपतराय यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आपली महत्वपूर्ण भुमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल – बाल – पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते.

1961: कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचा आजच्याच दिवशी 1961 साली मृत्यू झाला होता. मराठीतील साहित्यिक व समीक्षक अशी त्यांची ओळख. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत. ग्वाल्हेर येथील 43 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

2015 : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आजच्याच दिवशी 2015 साली मृत्यू झाला होता. ते 20 वर्षे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. डिसेंबर 2011 मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आपले पद सोडावे लागले. आग्र्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता.

2015 : कर्नल संतोष महाडिक शहीद

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले होते. कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना ते शहीद झाले होते. कर्नल संतोष महाडिक यांना हौतात्म्य आल्यानंतर खचून न जाता पत्नी स्वाती महाडिक स्वत: लष्करात दाखल झाल्या.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/17-november-in-history-lala-lajpatrai-and-balasaheb-thackeray-death-anniversary-dinvishesh-today-detail-marathi-news-1229040
0 Comments