मुंबई: एकेकाळी प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. शीना बोरा हिच्या मृतदेहाचे अवशेष गायब झाले आहेत. शिनाच्या (Sheena Bora Murder case) जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची धक्कादायक कबुली केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) न्यायालयात देण्यात आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी सीबाआय साक्षीदार हजर करू शकलेली नाही. शीना बोराच्या सांगाड्याच्या अवशेषातील काही हाडं सीबीआयकडून कोर्टात सादर केली जाणार होती. या हाडांच्या आधारावरच जे जे रुग्णालयातील अनाटॉमी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. मात्र, आता शीना बोराच्या सांगाड्यातील हाडं सापडत नसल्यानं आजवर तब्बल तीनवेळा सुनावणी तहकूब झाली आहे. तूर्तास खटल्याची सुनावणी 27 जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, ही सुनावणी जलदगतीनं संपवण्याकरता मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची कोर्टाकडे विनंती केली आहे.

शीना बोरा (वय 24) हिची एप्रिल 2012 साली हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शीनाची आई इंद्राजी मुखर्जी या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अनेक महिने ते तुरुंगात होती. मात्र, सध्या इंद्राणी मुखर्जीला जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे. सध्या न्यायालयाकडून शीनाच्या सांगाड्याची सर्वप्रथम तपासणी करणाऱ्या जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यक शाळेतील डॉक्टरांची साक्ष नोंदवून घेतली जात आहे. यावेळी सीबीआयकडून शीनाच्या सांगाड्याचे अवशेष न्यायालयात सादर केले जाणे अपेक्षित होते. त्याआधारे फॉरेन्सिक तज्ज्ञांची साक्ष नोंदवून घेतली जाणार होती. मात्र, आता हे अवशेष मिळत नसल्याची माहिती सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे शीनाच्या सांगाड्याचे अवशेष नेमके गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काय आहे शीना बोरा हत्याप्रकरण?

शीना बोरा हत्याप्रकरण प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले होते.

इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरातील गागोदे गाव गाठलं होतं. या गावाच्या परिसरात शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.

आणखी वाचा

शीना बोरा अजूनही जिवंत'; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा मुंबई सत्र न्यायालयात दावा

source https://marathi.abplive.com/news/mumbai/sheena-bora-bones-other-remains-recovered-by-cops-not-traceable-cbi-tells-court-1290717
0 Comments