<p> ABP Majha Headlines : 6:30 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स</p> <p>अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर बुधवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. </p> <p>प्राथमिक माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर ज्या खेरवाडी जंक्शनच्या परिसरात हल्ला झाला तेथील पथदिवे बंद होते. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला. त्यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात लागली. दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज आहे.</p> <p>बाबा सिद्दिकी यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तिन्ही हल्लेखोर पळून जात असताना जमावाने त्यापैकी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. सध्या पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तुल आणि गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. घटनास्थळी मिळालेली पिस्तूल 9.9 एमएम डिटेचेबल मॅगझिन 13 राऊंडची होती. ही पिस्तुल अत्याधुनिक बनावटीची असल्याचे सांगितले जाते. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-2024-6-30-am-13-october-2024-maharashtra-news-1318982
0 Comments