बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी (PDCC Bank) बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच बँकेत (PDCC Bank) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक (PDCC Bank) का उघडी ठेवण्यात आली होती याचा सवाल सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते विचारत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले होते, सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबतचा जाब विचारला आहे.

रंजन कुमार तावरे नेमकं काय म्हणालेत?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्याठिकाणी होते. सुनील मुसळे यांचा बँकेत अकरा वाजता काय काम आहे, या ठिकाणी पैशाची पाकीट भरायची हा उद्योग या ठिकाणी चालू होता, असा आरोप रंजन कुमार तावरे यांनी केला आहे. सभासदांना खरेदी करण्याचं काम सुरू आहे हे आम्ही कदापि चालू देणार नाही. आमची मागणी आहे याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे. सभासदाचे नाव त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि त्याची जबाबदारी कोणी घेतली, त्याचं देखील नाव आहे. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं देखील नाव आहे. त्यांची पीडीसीसी बँकेत काय जबाबदारी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं, शासकीय यंत्रणाचा वापर करेल आणि तसाच वापर इथे चालू आहे. डूबल हे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर आहेत. डुबल हे बारामतीत ठाण मांडून होते, इरिगेशन बंगल्यावरती बसत होते. त्यांनी ज्या पाणी वाटप संस्था आहेत त्यांना बोलवून घेतलं आणि हे पाणी कुठल्या सभासदांना जातं, त्यांना दम दिला आणि जर तुम्ही मदत केली नाही तर पाणी आडवेन असा दम देखील दिला आहे. डुबल यांचं माळेगाव कारखान्यात काय काम आहे. शिक्षणाधिकारी यांना फोन करून शिक्षकांना कामाला लावलं आहे. अंगणवाडी सेविका कामाला लावल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे त्यांनी या ठिकाणी येऊन कारवाई करावी असंही तावरे यांनी म्हटलं आहे. तर आम्हाला इथलं सीसीटीव्ही फुटेज मिळावं. त्याची तक्रार आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे देखील करणार आहोत असंही ते पुढे म्हणालेत

असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी दिलं स्पष्टीकरण

बँक साडेपाच वाजता बंद होते. मला फोन आला आणि त्यामुळे मी बँकेत आलो, रंजन काका आणि मी एकाच वेळी आलो. दुसऱ्या मजल्यावर संगणीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ती लोक बराच वेळ बसत असतात. मात्र या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या याद्या कशा सापडल्या हे मला सांगता येणार नाही, असं स्पष्टीकरण बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी दिलं आहे.

source https://marathi.abplive.com/news/pune/pdcc-bank-in-baramati-opens-at-11-pm-voter-lists-of-malegaon-sugar-factory-election-voter-list-also-found-money-distribution-alligation-baramati-politics-ajit-pawar-ncp-1364978
0 Comments