पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चौदा वर्षांपासून एकमेकांवर प्रेम केलं आणि त्यानंतर प्रेयसीनं घरच्यांच्या विरोधामुळं लग्नाला नकार दिल्यानं प्रियकरानं तिची हत्या केली आहे. लग्न करण्यासाठी नकार देणाऱ्या प्रेयसीला शेवटचे भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. विषेश म्हणजे 17 दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. हत्या झालेल्या तरुणीचे नाव मनीषा गेडाम (वय 30) असे आहे. पुण्यातील चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सागर गुडाव याला अटक केली आहे.

पुण्यात नोकरी निमित्ताने राहणारे मनीषा आणि सागर दोघेही मुळचे अमरावतीचे. दोघांमध्ये मागील 14 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेमाला कुटुंबियांच्या विरोध होता. त्यामुळं मृत मनीषा ही सागरसोबत लग्न करण्यासाठी नकार देत होती. त्यानंतरही सागर तिला सातत्याने फोन करायचा परंतु ती त्यालाही प्रतिसाद देत नव्हती. दरम्यान सागरने मनीषाला तुला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून 13 मार्च रोजी तिची भेट घेतली.

त्यानंतर दोघेही दुचाकी गाडीवरून फिरण्यासाठी बाहेर पडले. महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी जाण्याचा दोघांचाही प्लॅन होता. परंतु तो प्लॅन रद्द करून दोघेही भाटघर धरणाच्या दिशेने गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर मनीषा बेसावध असताना आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला. मागील 17 दिवसांपासून पोलीस या घटनेचा तपास करत होते आणि काल या आरोपीला अटक करण्यात आली.

मनीषा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. या संदर्भात संशय देखील सागरवर होता मात्र सागर सापडत नव्हता. अखेर 25 मार्च रोजी तो सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यात सागरने गुन्ह्याबाबत माहिती दिली. आता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

source https://marathi.abplive.com/news/pune/maharashtra-pune-crime-news-murder-of-lover-who-refuses-to-marry-after-14th-years-of-relationship-980385
0 Comments