Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणी 18 दिवसांत आरोपपत्र दाखल, 77 साक्षीदारांचे जबाबही नोंदवले

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या पाशवी बलात्कार प्रकरणी मंगळवारी (28 सप्टेंबर) मुंबई पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केलं आहे. या घटनेच्या अवघ्या 18 दिवसांत सर्व साक्षीपुरावे गोळा करून पोलिसांनी 346 पानांचं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानं संपूर्ण मुंबई हादरली होती. याप्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मंगळवारी मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात काल 2, 844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.26 टक्के
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.

राज्यात काल 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (04), नंदूरबार (4), धुळे (2), जालना (45), परभणी (58), हिंगोली (20), नांदेड (9), अकोला (29), वाशिम (09), बुलढाणा (18), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (5), चंद्रपूर (92), गडचिरोली (19 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

कोरोना लसीऐवजी रेबिजचं इंजेक्शन, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; डॉक्टर, परिचारिका निलंबित
खोटं आयकार्ड देऊन लस देणं, एकाच महिलेला 3 वेळा लस देणं अशा संतापजनक प्रकरणानंतर देखील ठाणे महापालिकेतील असे प्रकार थांबत नाही. कारण काल (मंगळवारी) पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पालिकेच्या कळव्यातील आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याच्या ऐवजी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.

ठाणे महानगर पालिका कळव्यातील आतकोनेईश्वर विभागात एक आरोग्य केंद्र चालवते. याच केंद्रामध्ये कोरोनाचं लसीकरण देखील सुरु असल्यानं, एक व्यक्ती कोरोना लस घेण्यासाठी 27 तारखेला गेली होती. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी त्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून त्याला लस घेण्यासाठी परिचारिकेकडे पाठवलं. मात्र परिचारिकेनं त्या व्यक्तीकडे असलेल्या कागदपत्राची पडताळणी न करताच त्याला थेट रेबीजचं इंजेक्शन देऊन टाकलं. ही गंभीर बाब काही वेळानंतर सर्वांच्या लक्षात आली. महापौर नरेश म्हस्के यांना हे प्रकरण समजताच त्यांनी काल ठाणे महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागातील आणि पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर महापौरांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेनं ताबडतोब कारवाई करत या दोघींना निलंबित केलं आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता
पालघर जिल्हा परिषद निवडणुकींसाठी भाजप-मनसे युतीनंतर आता मनसे-भाजप युतीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. पालघर पाठोपाठ पुण्यात मनसे नेत्यांनी भाजपसोबत युती करण्याची मागणी केली तर अशीच मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींसाठी केली जात आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करायचंच असा चंग भाजपनं बांधला आहे. त्यात भाजपला मनसेची सरळ सरळ साथ मिळते का पडद्यामागून हा महत्वाचा प्रश्न आहे.

राजकारणात काहीही अशक्य नसतं, असं म्हणतात. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, यापैकी कोणाच्याही राजकीय भूमिका एकमेकांशी मेळ खाणाऱ्या नाहीत. तरीही हे सगळे एकत्र आले. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे मनसेचं कार्यक्षेत्र आहे. मराठी माणसावर अन्यायाचा मुद्दा पुढं करून मनसेनं परप्रांतीयांविरोधात राडेही केले आहेत. त्यामुळं मनसेची प्रतिमा परप्रांतीयविरोधी अशी झाली आहे. भाजपसाठी तो चिंतेचा मुद्दा आहे. मात्र, 25 वर्षांपूर्वी शिवसेनेची प्रतिमा नेमकी अशीच होती. तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून त्यावर तोडगा काढण्यात आला. यावेळीही तोच फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-29-2021-maharashtra-political-news-1005470
0 Comments