Maharashtra Rain LIVE Update : उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांत पावसाचं रौद्ररूप पहायला मिळत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. इतर ठिकाणीही अनेकांच्या घरात पाणी घुसलं आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सूचना दिल्या असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकानं लागवडीच्या क्षेत्रात गेल्या दशकभरापासून मोठी आघाडी घेतली आहे. यावर्षीच्या लागवडीचा तर देशात मोठा विक्रम झाला आहे. मध्य प्रदेशला मागे टाकून सोयाबीनची महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त लागवड झाली आहे. सध्या सतत पाऊस पडतो आहे. त्याचा सोयाबनीला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबिनला कोंब फुटू लागले आहेत. मुसळधार बरसणाऱ्या पावसानं बळीराजाची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो.

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून आज सकाळी पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वच नदी ओढ्याना पूर आलेला आहे. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. अनेक प्रकल्प पूर्ण भरले असून काही प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-live-update-heavy-rains-across-the-state-including-marathwada-and-vidarbha-1005471
0 Comments