<p>कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे जवळपास १५ महिने बंद आहेत त्यामुळे भाविकांचं नसल्याने तिजोरीचाही खडखडाट झाला आहे . मात्र मंदिरे बंद असली तरी देवाचे नित्योपचार नियमानुसार सुरु असून मंदिराची भक्त निवास , दर्शन मंडप आणि इतर उपक्रमाचा खर्चही सुरूच आहे . यामुळे आता मिळणारे तोकडे उत्पन्न देखील सगळे वीज बिल भरण्यात जाऊ लागल्याने कर्मचारी पगार आणि इतर खर्चाचा प्रश्न देखील आ वासून समोर उभा राहिला आहे . वास्तविक राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे संकट संपले नसल्याने मंदिर न उघडण्याची राज्य शासनाची भूमिका रास्त आहे पण आता मंदिरांच्या खर्चाचा बाबतीत देखील मदतीच्या दृष्टीने विचार करणेचे गरजेचे बनले आहे . </p> <p>विठ्ठल मंदिर गेल्या १५ महिन्यापासून बंद असल्याने मंदिराला जवळपास ६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे . दरवर्षी विठ्ठल मंदिराला विविध माध्यमातून जवळपास ३२ ते ३५ कोटीचे उत्पन्न मिळत असते . सध्या मात्र मंदिर बंद असल्याने केवळ मंदिराबाहेर नामदेव पायरी येथे असलेल्या पेटिट भाविकांकडून टाकलेल्या पैशातून मंदिराचा खर्च सुरु आहे . या पेटिट महिन्याला साधारण आठ ते साडे आठ लाख रुपये जमा होतात . मात्र याचवेळी विठ्ठल मंदिर , २७२ रूमचे भक्त निवास , तुकाराम भवन , दर्शन मंडप , गोशाळा अशा मंदिराच्या उपक्रमांसह येणारे वीज बिल महिन्याला जवळपास ७ लाख रुपये येते . म्हणजे पेटिट येणाऱ्या उत्पन्नातील ८४ टक्के रक्कम हि नुसते वीज बिल भरण्यासाठी जाते . वास्तविक जेंव्हा मंदिर सुरु असते तेंव्हा मंदिराचे वीज बिल महिन्याला १२ ते १३ लाखापर्यंत येत असते पण अशावेळी मंदिराचे उत्पन्नही महिना सरासरी अडीच ते तीन कोटी पर्यंत असल्याने या बिलाची अडचण भासत नाही . मंदिरे उघडी असताना विठ्ठल मंदिराचा वर्षभराचा वीज बिलाचा खर्च जवळपास १ कोटी ४४ लाखापर्यंत असतो . तर मंदिर कर्मचाऱ्यांचे पगार वर्षाला ४ कोटी २० लाख रुपये असतात . देवाच्या नित्योपचाराला सरासरी वर्षाला २१ लाखांचा खर्च येतो . पण सध्या लॉक डाऊन मुळे भाविकांकडून येणारे उत्पन्न थांबले असताना वीज बिलापोटी वर्षाला जवळपास ८४ लाखाचे बिल भरणे विठ्ठल मंदिरासारख्या मोठ्या संस्थेलाही अडचणीचे बनत आहे . अशाच पद्धतीने इतर लहान मोठ्या मंदिरातही वीज बिलापोटी लाखो रुपये भरावे लागत आहेत . मंदिरात भाविक नसल्याने उत्पन्न बंद असताना हि भल्या मोठ्या रकमेची बिले द्यायची कशी हाच प्रश्न आता देवस्थानांना सतावू लागला आहे . शिखर शिंगणापूर मंदिराचीही अशीच अवस्था असून सध्या मंदिर बंद आणि लाखोंची वीज बिले पेंडिंग अशी स्थिती झाली आहे . आता कोरोनामुळे अजून काही दिवस मंदिरे बंद ठेवायची असली तरी किमान या मंदिराच्या वीजबिलांना किमान सवलत देण्याची भूमिका शासनाने घेण्याची मागणी होऊ लागली आहे .</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-vitthal-temple-having-7-lakh-rupees-per-month-electric-bill-1001597
0 Comments