Nawab Malik On Devendra Fadnavis : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून आता या प्रकरणी दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहेत. अशातच आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. यावेळी मलिकांच्या निशाण्यावर मिस्टर अँन्ड मिसेस फडणवीस असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांनी आज माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली असून अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ राज्यात सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

नवाब मलिकांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांच्या आशीर्वादानं ड्रग्जचा काळा धंदा सुरु आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

तर दुसरीकडे, जयदीप राणाचा फोटो आज नवाब मलिक यांनी ट्वीट केला. जयदीप राणाचा हा फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबतचा होता. अमृता फडणवीस यांनी एक रिव्हर अँथम गायलेलं होतं. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकलेले होते. याच गाण्याचा फायनांसर हा जयदीप राणा होता, अशी माहिती नवाब मलिकांनी बोलताना दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्सचा खेळे सुरु आहे, असा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला आहे. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदर यांचं वर्तन संशयास्पद आहे : नवाब मलिक

सामाजिक न्याय केंद्रीय राज्य मंत्री बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवलेल्या व्यक्तीचं समर्थन करत आहेत. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदरजी भाजपचे नेते असतील. पण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. कार्यपद्धती समजून घ्यावी. ज्या पदावर बसले आहेत, त्यांचं आचरण कसं असायला हवं? या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडत आहेत. समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन ते क्लिन चीट कशी देऊ शकतात? संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लिनचिट कशी देऊ शकते? याची आम्ही राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी करणार आहोत. बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीबद्दल ममत्व का दाखवतं होते? त्यांनी मला अशीही धमकी दिलेय की, जास्त बोलाल तर अट्रासिटी कायद्याअंतर्गत कारवाई करुन तुरुंगात टाकू. जो व्यक्ती मागासवर्गीय नाही, त्याच्या आधारावर तुम्ही मला धमकावायचं काम करत आहात? आमचाही राजकीय अनुभव आहे. सर्वांनी मर्यादेत राहायला हवं, असे नवाब मलिक म्हणाले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-cruise-drug-case-drug-racket-are-being-played-in-state-at-behest-of-devendra-fadnavis-big-allegation-of-nawab-malik-1010522
0 Comments