Nawab Malik On Devendra Fadnavis : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून आता या प्रकरणी दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहेत. अशातच आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. यावेळी मलिकांच्या निशाण्यावर मिस्टर अँन्ड मिसेस फडणवीस असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांनी आज माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली असून अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ राज्यात सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

नवाब मलिकांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांच्या आशीर्वादानं ड्रग्जचा काळा धंदा सुरु आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

तर दुसरीकडे, जयदीप राणाचा फोटो आज नवाब मलिक यांनी ट्वीट केला. जयदीप राणाचा हा फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबतचा होता. अमृता फडणवीस यांनी एक रिव्हर अँथम गायलेलं होतं. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकलेले होते. याच गाण्याचा फायनांसर हा जयदीप राणा होता, अशी माहिती नवाब मलिकांनी बोलताना दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्सचा खेळे सुरु आहे, असा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला आहे. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-nawab-malik-allegations-on-devendra-fadnavis-over-mumbai-drugs-case-1010524
0 Comments