ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री तिन्ही पक्षाच्या आमदारांशी संवाद साधणार

आज मुख्यमंत्री महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांसह समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतील घोडाबाजार टाळण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे. ही बैठक हॉटेल ट्रायडंटला होणार आहे. शिवसेनेकडून आमदारांना व्हीपही जारी करण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचा मुक्काम कुठल्या हॉटेलमध्ये?

काँग्रेसच्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना, अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना आजपासून मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेस आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. तर, भाजपच्या आमदारांना 9 तारखेला ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. कालपासून शिवसेना आमदारांचा मुक्काम मढमधील रिट्रीट हॉटेलमध्ये आहे.

राज्यसभेसाठी एमआयएमची भूमिका काय?

ओवेसींची आज नांदेडमध्ये बैठक आहे तर लातुरात जाहीर सभा आहे अससदुद्दीन ओवैसी यांची सकाळी 11 वाजता नांदेडमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी 6.30 वाजता ओवेसींची जाहीर सभा होणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते?

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 जून असली तरीही भाजपकडून 8 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते. यात कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अकोला महामार्गाचं बांधकाम आज विक्रमी वेळेत पूर्ण होणार

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे विक्रमी बांधकाम 3 जून पासून सुरू झाले असून आज हा 75 किमीचा रस्ता बांधून पूर्ण होत आहे. या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असून महामार्गावरील लोणी ते बोरगाव मंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रिट पद्धतीने होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता या प्रकल्पाचा समारोप होणार असून यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पुणतांबा आंदोलकांची मंत्रालयात महत्वाची बैठक...बैठकीवरुन आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

पुणतांब्यातील 10 सदस्य आणि मंत्र्यांची बैठक आज दुपारी 3 वाजता मंत्रालयातील अजित पवारांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पुणतांबा येथे ग्रामसभेत पुढील निर्णय जाहीर होणार आहे.

आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं राजकीय भवितव्य ठरणार..अविश्वास ठरावावर मतदान

जून 2020 मध्ये लॉकडाऊन असताना जॉन्सन यांच्या पत्नीनं बोरिस यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमांमध्ये दोनपेक्षा अधिक नागरिकांना जमण्याची परवानगी नसताना या पार्टीत 30 नागरिक उपस्थित होते. याच प्रकरणावरुन जॉन्सन यांना दंड ठोठावण्यात आला होता. तसेच, याला पार्टी गेट घोटाळा असं नाव देण्यात आलं होतं. यावरुन ब्रिटनमधील राजकारण तापलं. या पार्टीमुळे सरकारची, प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली. जॉन्सन यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांनी देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याच प्रकरणावरुन बोरिस जॉन्सन यांना अविश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागतोय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन करणार आहेत. देशभरातील 100 हून अधिक आदिवासी कारागीर आणि आदिवासी नृत्य मंडळे त्यांची स्वदेशी उत्पादने यामध्ये दाखवणार आहेत.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/w6MhDP1
via IFTTT
0 Comments