ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

कुतुबमिनार परिसरात हिंदूना पुजेचा अधिकार मिळणार? आज कोर्ट सुनावणार निकाल

कुतुबमिनारच्या परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्लीच्या साकेत कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 उद्घाटन करण्यात येणार आहे. बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 चे राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद जम्मू दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज जम्मू दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती या दरम्यान आयआयएमच्या पदवी प्रदान सोहळ्याला देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच वैष्णवी मातेच्या दर्शनासाठी देखील जाणार आहेत.

सत्येंद्र जैन यांना न्यायालयासमोर हजर करणार

दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना ईडीने 9 जूनपर्यंत कोठडी दिली होती. आज कोठडी संपत असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे.

देशमुख आणि मलिकांना मतदानाची परवानगी मिळणार का? आज निर्णय येणार

शुक्रवारी राज्यसभेकरता मतदानाला हजेरी लावण्याची परवानगी मागत कोर्टात अर्ज केलाय. दोघांच्या अर्जाला ईडीचा जोरदार विरोध. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही, असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. काल दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीश राहुल रोकडे गुरूवारी पहिल्या सत्रात निकाल जाहीर करणार

मुंबई वाहतूक पोलिसांची मोहीम आजपासून सुरु होणार

मुंबईत जर तुम्ही फिरण्यासाठी मोटारसायकलवर मागे बसण्याचा विचार करत असाल, मग हेल्मेट घाला नाहीतर मुंबई वाहतूक पोलीस तुम्हाला दंड करायला तयार आहेत. मुंबईत मोटारसायकलवर हेल्मेटशिवाय बसणाऱ्यांवर आजपासून कारवाई करणार आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी- 20 सामना

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पहिला टी20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारताचं कर्णधारपद केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋषभ पंतकडे गेलं आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. तर या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-09-june-2022-today-thursday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1067742
0 Comments