Tanaji Sawant In Pune : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) तीन दिवस पुण्यात (Pune) असणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांचा या तीन दिवसांचा दौरा जाहीर करण्यात आला. या दौर्‍यात मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातील कात्रज भागातील त्यांच्या घरून निघून कात्रजमधील बालाजी नगर भागातील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाणार आणि तिथून पुन्हा त्यांच्या घरी परतणार एवढा प्रवास करणार आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज मधील घरापासून त्यांच्या उद्योग समूहाचे कार्यालय अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र तीन दिवसांत मंत्री घर ते उद्योग समूहाचे कार्यालय आणि पुन्हा घर या दरम्यानच प्रवास करणार आहेत. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर, असा हा दौरा आखण्यात आल्यामुळे त्याचा पुणे दौरा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दरवेळी कोणत्याही नेते किंवा मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला की त्यांचा विविध ठिकाणचा आढावा असतो. काही बैठका असतात महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी असतात, पत्रकार परिषद किंवा सभा असतात मात्र नवनिर्वाचीत आरोग्य मंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या दौऱ्यात कोणत्याही बैठका, सभा किंवा पत्रकार परिषद नसल्याने आणि या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने सगळीकडे या दौऱ्याची चर्चा होत आहे.

त्यांच्या या दौऱ्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर विरोधकांनी टीकासुद्धा केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुकवर त्यांच्या दौऱ्याचा फोटो शेअर करत या अजब दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. 'हा किती कामाचा दौरा आहे पहा, महाराष्ट्राची वाटोळे करणारे हेच अडाणी लोक घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर', अशी टीका त्यांनी फेसबुकवरुन केली आहे.

सोशल मीडियावर कायम चर्चेत

शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यापासून तानाजी सावंत हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहेत. कोण ते आदित्य ठाकरे? असं त्यांनी विधान केलं होतं. यावरुन चर्चेत राहिले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विरोधकांकडून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरुन देखील ते सोशल मीडियावर चर्चेत होते. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांची दमछाक झाली होती.

source https://marathi.abplive.com/news/pune/political-news-health-minister-tanaji-sawant-visit-to-pune-went-viral-1094011
0 Comments