Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत.
दरम्यान, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. त्याचबरोबर नाशिक (Nahsik) जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात कालपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा पावसानं चांगली हजेरी लावली आहे.

जालना जिल्ह्यातही पावसाची हजेरी

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत. वडीगोद्री परिसरात झाडे पडली असून घरावरील छप्पर देखील उडाले आहे. तसेच काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडाले आहेत. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर ओढ दिलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळालं आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-live-updates-4-september-2022-rain-in-some-places-in-the-state-1096709
0 Comments