<p>राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तापरिवर्तनाबाबत आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण कुणाचा?, याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार की केंद्रीय निवडणूक आयोगात याकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर दुसरी सुनावणी होतेय. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आलाय, त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातल्या प्रश्नांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयोगाकडून निर्णय होऊ नये ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. तर आयोगाला यावर निर्णय घेऊ द्यावा अशी शिंदे गटाची मागणी आहे. याशिवाय आमदारांची अपात्रता आणि सरकारच्या वैधतेला दिलेलं आव्हान याबाबतच्या याचिकांवरही सुनावणी अपेक्षित आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-hearing-today-before-the-constitution-bench-on-the-politics-in-maharashtra-1104333
0 Comments