30th August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पुण्यात नारायण पेशवे यांची आजच्या दिवशी हत्या झाली. स्वत:च्या काकांच्या गारद्यांनीच नारायणराव पेशव्यांची हत्या केली आणि संपूर्ण मराठेशाही हादरली. अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा आज जन्मदिन देखील आहे. आजच्या दिवशी इतरही कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.

1773: नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या

30 ऑगस्ट 1773 ला पुण्यातील शनिवारवाड्यात भर दुपारी जे घडलं त्यानं संपूर्ण मराठेशाही हादरली. अधिकारावर असलेल्या पेशव्यांची हत्या झाली. वयाच्या अठराव्या वर्षी नारायणराव पेशव्यांना गारद्यांनी मारलं. नारायणराव पेशवे यांच्या काळात पुण्यात कमी-अधिक पाच हजारांवर गार्दी होते. त्यात हिंदू होते, तसेच मुसलमनदेखील होते. त्या वेळी ते पुण्यात पोलिसी कामं करत असे.

30 ऑगस्ट 1773 या दिवशी शनिवारवाड्यात गणेशोत्सवाचा कालावधी असताना दुपारच्या प्रहरी गारद्यांनी वाड्यात घुसून नारायणरावांची हत्या केली. सुमेर गार्दी याने नारायणराव पेशव्यांची हत्या केली. गार्दी हे तेव्हा पैसे देऊन सुरक्षा पुरवायचे. गार्दी मागे लागले तेव्हा नारायणराव वाड्यात पळत होते. वाचवण्यासाठी त्यांनी रघुनाथरावांकडे 'काका मला वाचवा' अशी आरोळीही दिली, पण मदत मिळाली नाही.

इतिहासात ही नोंद आहे की. या कृत्याची जबाबदारी ही नारायणराव पेशव्यांचे काका रघुनाथराव, म्हणजेच राघोबादादा यांच्याकडे जाते. याप्रकरणी त्या वेळचे न्यायमूर्ती रामशास्त्र्यांनी त्यांना दोषीही धरलं. पण त्यांनी सुनावलेलं देहांत प्रायश्चित्त रघुनाथरावांनी घेतलं नाही. मात्र नंतर दुसरी शिक्षा त्यांना मिळाली. यात सहभागी झालेल्या अन्यांना शिक्षाही झाल्या.

राघोबादादांच्या गारद्यांनी नारायणराव पेशव्यांना मारलं खरं, पण इतिहासानं या प्रकरणाचं खलनायकत्व आणखी एका व्यक्तीकडे दिलं आणि ते म्हणजे रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाई.

याचं कारण आहे 'ध चा मा' होणं. राघोबादादांनी गारद्यांना नारायणराव पेशव्यांना 'मारण्या'चे नव्हे तर 'धरण्या'चे आदेश दिले होते, पण त्यांनी लिहिलेल्या पत्रात ऐनवेळेस 'ध'च्या जागी 'मा' असं केलं गेलं. त्यामुळे गारद्यांनी नारायणरावांना न धरता मारून टाकलं आणि हा पत्रातला 'ध चा मा' आनंदीबाईंनी केला होता, असं कायम सांगितलं गेलं आहे.

1773 मध्ये नारायणरावांची हत्या करुन त्यांचे काका राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. परंतु नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खुनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, त्यानंतर राघोबांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावांचे पुत्र माधवराव दुसरा, म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवलं. 1796 पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली.

1930: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म

वॉरन बफे (Warren Buffet) हे एक अमेरिकन गुंतवणूकदार आणि उद्योगपती आहेत. 1930 मध्ये आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. बफे यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येतं. वॉरन बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष आणि प्रमुख अधिकारी आहेत. 2008 साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, तर 2011 साली ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्टॉकब्रोकरचा मुलगा असल्याने ते अगदी लहान वयातच शेअर बाजारात सामील झाले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, वॉरन बफे यांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 85 टक्के संपत्ती ही बिल गेट्सच्या 'बिल मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'ला दान केली. जगाच्या इतिहासातील ते सर्वात मोठे देणगीदार ठरले आहेत.

इतर महत्त्वाच्या घटना:

1574: गुरू रामदास शीखांचे चौथे गुरू बनले.

1835: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.

1904: उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म.

1945: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.

1954: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.

1979: सुमारे 10 लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.

2014: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचं निधन. (जन्म: 27 मे 1928)

2015: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचं निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1938)

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/30th-august-in-history-on-this-day-in-history-narayanarao-peshwe-was-murdered-in-shaniwarwada-american-businessman-warren-buffet-birthday-1205244
0 Comments