28th September In History :  इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आजचा दिवसही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिन आहे. तर, रेबीज सारख्या आजारावर प्रभावी लस शोधणारे लुई पाश्चर या शास्त्रज्ञांचा स्मृतीदिन आहे.

आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस

28 सप्टेंबर हा दिवस जगभरात रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक रेबीज दिन ही अमेरिकेत मुख्यालय असलेली ना-नफा संस्था, 'ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल' द्वारे समन्वित केलेली आंतरराष्ट्रीय जागरूकता मोहीम आहे. संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ सारख्या संघटनांनी हा दिवस साजरा करण्यास पाठिंबा दिला आहे.

जागतिक रेबीज दिवस हा 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. रेबीज आजारावर लस शोधणारे शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा स्मृतीदिन आहे. रेबीज आजाराबाबत समाजात जागरुकता वाढवणे हा या दिनाचा उद्देश आहे. रेबीजवर परिणामकारक लस, औषधे असूनही अनेक देशांमध्ये रेबीजमुळे लोकांना प्राण गमवावे लागत आहे.

1838- शेवटचा मुघल सम्राट बहादुरशाह जफर सम्राट बनला

आजच्याच दिवशी, 28 सप्टेंबर रोजी मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट बहादुरशाह जफर त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर सम्राट बनला. ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव केल्यानंतर आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आणि बहादुरशाह जफर याला सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं. पण 1857 च्या उठावात क्रांतिकारकांनी बहादुरशाह जफर याला पुन्हा एकदा दिल्लीचा बादशाह घोषित केलं आणि ब्रिटिशांशी लढा पुकारला. नंतर ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि बहादुरशाह जफर याला रंगून म्हणजे आताच्या म्यानमारला पाठवलं.

1895 : रेबीजवर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन

लुई पाश्चर हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. पाश्चार यांनी केलेल्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनसाठी लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावाने ओळखली जाते. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते "मायक्रोबायोलॉजीचे जनक" म्हणून प्रसिद्ध आहेत. लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.

1929 : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमध्ये झाला. लतादीदींना पहिले संगीताचे धडे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडून मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या अकस्मात निधनानंतर वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक ह्यांनी मंगेशकर कुटुंबाची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लतादीदी यांनी सुरुवातीच्या काळात अभिनेत्री म्हणून काही चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या. त्याच दरम्यान त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.

आपल्या गायिकेच्या जोरावर लता मंगेशकरांनी संगीत क्षेत्रावर आपली एक वेगळीच छाप उमटवली. लता मंगेशकरांनी 20 भाषांमधील तीस हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकरांना 2001 साली 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. त्या आधी त्यांना पद्मभूषण (1969), पद्ममविभूषण (1999), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

2012 : ब्रिजेश मिश्रा यांचे निधन

भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा (Brajesh Mishra) यांचे आजच्या दिवशी, 28 सप्टेंबर 2012 रोजी निधन झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते त्यांचे मुख्य सचिव होते. 1999 मध्ये कारगिल युद्धामध्ये पंतप्रधान वाजपेयी यांना सल्ला देण्याची प्रमुख भूमिका त्यांनी बजावली होती. देशाच्या पहिल्या सुरक्षा सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

2018 : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

केरळच्या शबरीमला अयप्पा मंदिरामध्ये (Shabarimale Swamy Ayyappa) 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश बंदीचा निर्णय घालण्यात आला होता. शबरीमाला मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रह्मचारी मानलं जातं. या वयोगटातील महिलांच्या मासिक पाळीमुळे त्यांना या मंदिरात प्रवेश नाकारण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आणि सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं.

इतर महत्त्वाच्या घटना :

1924: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
1982: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.
1999: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
2000: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.
2002 : सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात. एकाचा मृत्यू, तर चार गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक आणि त्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
2008: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन-1 हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/28th-september-in-history-on-this-day-lata-mangeshkar-birth-anniversary-louis-pasteur-death-anniversary-1213200
0 Comments