Pandharpur Vitthal Rukmini Mandir: पंढरपूर : एका बाजूला नाताळच्या सुट्ट्या सुरू होत असल्यानं 25 डिसेंबरपासून पंढरपुरात (Pandharpur News) पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. ज्येष्ठ शिवपुराण महात्म कथाकार प्रदीप मिश्र यांचा 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होत असल्याने देशभरातून 8 ते 10 लाख भाविक पंढरपूर मध्ये येणार आहेत . याचवेळी राधाकृष्ण महाराजांसह देशातील अनेक मान्यवर संत मंडळींच्या उपस्थितीत रस महोत्सव हा दुसरा कार्यक्रम 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात होणार असल्याने यासाठी देखील हजारोंच्या संख्येने मारवाडी समाज पंढरपूरमध्ये येणार आहे. यामुळे 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत पंढरपूर मध्ये आषाढी सारखी गर्दी होणार आहे . या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेसाठी गोपाळपूर भागात 10 पत्राशेड उभारणीचे काम सुरू केले आहे. याशिवाय पोलीस आणि महसूल प्रशासनानेही येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे जादाच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर भारतात अतिशय लोकप्रिय असणारे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण माहात्म्य ऐकण्यासाठी ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. विठुरायाच्या मस्तकी शिवलिंग असल्याने विठुराया हा हरिहर रूपात उभा आहे. याचमुळे पंढरपुरात आपला कार्यक्रम करण्याची महाराजांची अनेक वर्षाची इच्छा होती. यासाठी यावर्षी जानेवारी महिन्यात परभणी येथील कार्यक्रमात ही इच्छा त्यांनी खासदार बंडू जाधव यांना बोलून दाखवल्यावर त्यांनी यासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली. यासाठी परभणी येथून अनेक व्यापारी या जेवणाच्या तयारीसाठी आठ दिवस आधीपासून पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र असल्यानं देवाच्या दारात या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येनं समाज जमा होणार आहे. यासाठी चंद्रभागा बस स्टॅन्डच्या विशाल मैदानावर सध्या मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी घेतली आहे.

दरम्यान, पंडित राधाकृष्ण महाराज यांचा रस महोत्सव यंदा महाराष्ट्रात पंढरपूर येथे 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात होत असल्यानं यासाठीही हजारोंच्या संख्येनं समाज येणार आहे. हा कार्यक्रम मंदिराच्या भक्त निवासासमोर असणाऱ्या मातोश्री मनमाडकर मठाच्या विस्तीर्ण पटांगणात होणार आहे. एकाच वेळेत आठ दिवसांसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येणार असल्यानं दोन महिन्यांपूर्वीच शहरातील सर्व हॉटेल, लॉजेस, भक्तनिवास आणि धर्मशाळा बुक झाल्या आहेत. येणारे भाविक आता पंढरपुरात जागा नसल्यानं आसपासच्या शहरात हॉटेल मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. सध्या नाताळाच्या सुट्ट्या सुरु होणार असल्यानं पंढरपुरातील गर्दी वाढत चालली असताना आता 25 डिसेंबरपासून आठ दिवस 10 ते 12 लाख भाविक 7 दिवस राहण्यासाठी येणार असल्यानं पंढरपुरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/solapur/crowd-of-devotees-in-pandharpur-due-to-two-big-religious-events-preparation-of-administration-vitthal-rukmini-mandir-maharashtra-marathi-news-1237988
0 Comments