Bhiwandi News :भिवंडी शहरातील नायगाव परिसरात अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील फ्लॅटचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत आई देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज (28 मार्च) पहाटेच्या सुमारास घडली. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबावर अचानक छताचे प्लास्टर कोसळले. त्यात घरात झोपलेल्या आई आणि बाळ गंभीर जखमी झाल्याने तत्काळ त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सहा महिन्याच्या चिमुकल्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आई जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे.

धोकादायक इमारतींच्या देखभालीबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे भिवंडीतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या देखभालीबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती एक मध्ये अनेक जुन्या इमारती आहेत, ज्या धोकादायक स्थितीत असून त्यांचे वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती होत नाही. परिणामी, अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मनपा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींची तत्काळ तपासणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास शांतीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

एका निरपराध जीवाचा मृत्यू… जबाबदार कोण..?

मिरा भाईंदर महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका बिचाऱ्या निरपराध मांजरीने वेदनांनी तडफडत आपला जीव गमावला आहे. तिच्या डोळ्यांत मदतीची आस होती, पण सिस्टीमच्या दुर्लक्षामुळे तिला योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत ती मांजर एका कोपऱ्यात शांत बसली होती. काही संवेदनशील प्राणीमित्रांनी तिला पाहिलं आणि तातडीने मदतीसाठी मनपा पशुवैद्यकीय कक्षाशी संपर्क साधला. पण नियोजित वेळेतही डॉक्टर अनुपस्थित होते. वेळ निघून जात होती आणि त्या निष्पाप जीवाचा श्वास मंदावत चालला होता.

अखेर, संतप्त प्राणीमित्र मांजराला घेऊन थेट महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांच्या डोळ्यांत असहायतेचे अश्रू होते. “जर वेळेवर उपचार मिळाले असते, तर ही बिचारी आज जिवंत असती!” असं प्राणीमित्र सलीम शेख दुःख आणि रागाने सांगत होता.

महापालिकेच्या भल्यामोठ्या २६९४ कोटी ८९ लाखांच्या बजेटमध्ये एक तरी शासकीय पशु रुग्णालय का नाही? निरपराध प्राण्यांच्या जिवाला किंमत नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.या घटनेनंतर शहरातील प्राणीप्रेमींनी मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आयुक्तांनी , चौकशीचे आदेश दिले आहेत, पण प्राण्यांसाठी नेहमी उपलब्ध असणारं रुग्णालय कधी सुरू होणार? अजून किती बिचारे जीव असाच तडफडत मरतील? असा सवाल आता विचारला जात आहे. या मांजरीचा मृत्यू केवळ तिचा मृत्यू नाही, तर तो संपूर्ण मिरा भाईंदर पालिकेच्या व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा आरसाच म्हणावं लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या

मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप

source https://marathi.abplive.com/news/bhiwandi-news-six-month-old-baby-dies-after-building-plaster-collapses-incident-in-naigaon-area-of-bhiwandi-maharashtra-marathi-news-1351402
0 Comments