Army Operation In Pakistan After Pahalgam Attack : अखेर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय हवाई दलानं 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तान अन् दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतलाय.

भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलंय. त्यात अनेक दहशतवाद्यांचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. अशातच ही मोहीम फत्ते करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून ही अनेक प्रतिक्रिया समोर येत असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी, राजकीय वर्तुळात कोण काय म्हणाला?

राहुल गांधी : भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बोलताना काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आपली प्रतिक्रिया देत भारतीय सेनेचे कौतुक केलं आहे. यात ते म्हणाले की, 'आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर ऑपरेशननंतर लगेचच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी X वर "भारत माता की जय" पोस्ट केले, तर भारतीय सैन्याने म्हटले आहे की "न्याय मिळाला."

भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान - शरद पवार

शरद पवार: आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन तर पीडित कुटुंबियाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानी डीप स्टेटला असाच कठोर धडा शिकवला पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आपल्या संरक्षण दलांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला कठोर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून दुसरी पहलगाम पुन्हा कधीही घडणार नाही. पाकिस्तानचे दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केले पाहिजेत. जय हिंद! अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मजलिस-ए-मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी दिली आहे.

आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च- मल्लिकार्जुन खरगे

दरम्यान, भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबाबत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, पाकिस्तान आणि पीओकेमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध भारताचे एक अढळ राष्ट्रीय धोरण आहे. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळ रोखणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि धाडसाचे कौतुक करतो.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दिवसापासून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी सशस्त्र दल आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राष्ट्रीय एकता आणि एकता ही काळाची गरज आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवला आहे आणि आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे. असेही ते म्हणाले आहे.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील- अजित पवार

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केले आहे. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेनेच्या नेतृत्वाचे आणि सैनिकांचे अभिनंदन केले आहे.

सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केले बेचिराख-

बहावलपूरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी

मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी

मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी

कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी

सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी

गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी

भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी

चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/EB13aLN Sindoor: वंदे मातरम्! पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त; पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते 'ऑपरेशन सिंदूर'

source https://marathi.abplive.com/news/politics/operation-sindoor-success-by-indian-army-praised-across-the-entire-country-and-came-together-rahul-gandhi-sharad-pawar-pm-modi-know-more-who-said-what-1357949
0 Comments