Tahwoor Rana Custrody : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला दिल्लीत आणणार

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (26/11 mumbai attack) मास्टरमाईंड आणि भारताचा शत्रू तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) घेऊन एनआयए पथक थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होत आहे. राणाच्या प्रत्यर्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालं. राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे.

काही वेळातच तहव्वूर राणाला घेऊन एनआयए पथक दिल्लीत दाखल होईल. राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्यात. दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं. तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात. तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे.

तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएची सात सदस्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. त्यात काही वरिष्ठ वकीलही आहेत. एडीजी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यर्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलीय. विशेष म्हणजे २६/११ च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रूग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं होते. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी त्यावेळी अनेकांचे प्राण वाचवले होते. राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत खटला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-26-11-mastermind-tahwoor-rana-delhi-custody-internantinol-news-1353591
0 Comments